श्रीक्षेत्र मुर्डेश्वर-पंढरपूर पायी दिंडीचे सिल्लोडमध्ये उत्स्फूर्त स्वागत

Foto
संत सावता महाराज मंदिरात महाप्रसाद

सिल्लोड, (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र मुर्डेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी यात्रा आज सिल्लोड शहरातील संत सावता महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. दिंडीच्या आगमनानिमित्त मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी भाविकांचे स्वागत करून त्यांना आषाढी वारीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजात भक्ती, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची ओळख असून, या परंपरेचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिंडीच्या आगमनामुळे संत सावता महाराज मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि हरिनामाच्या घोषात परिसर दुमदुमून गेला. महाप्रसादाचा लाभघेण्यासाठी तसेच दिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

याप्रसंगी श्रीक्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानचे पीठाधीश विद्यानंद महाराज, ह.भ.प. मनोज महाराज भाग्यवंत, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अर्जुन पा. गाढे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, गणेश पाटील, सिल्लोड सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, मंजितराव भाग्यवंत, संतोष घाडगे, जगन्नाथ कुदळ यांच्यासह वारकरी, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.